श्री गुरुदेव दत्त (संत कोणाला म्हणावे )

🌺🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺

मनातील काही प्रश्न व उत्तरे

संत कोणाला म्हणावे ?*

काम, क्रोध, लोभ आणि द्वेष या विकारांनी ज्याला सोडले तो. प्राणायामादि कष्टांवाचून ज्याचे मन  अदृश्यात किंवा सूक्ष्मात स्थिर झाले तो.  तसेच ज्याचे अंतरी भगवंत अचलपणे राहतो तो.
*२) भगवंताला ओळखावे कसे?*
संताला ओळखले की भगवंताला आपोआप ओळखता येते. संत आणि भगवंत स्वानंदाच्या दोन बाजू आहेत.
*३) संत कसा असतो ?*
संत बाहेरून म्हणजे शरीराने माणूस दिसतो व माणसासारखा वागतो.  परंतु तो आतून म्हणजे मनाने आनंद रूप असतो आणि भगवत्प्रेमाने भरून वाहतो.
*४) आपल्याला समजणारी संताची खूण कोणती ?*
श्वासाप्रमाणे सहज, चोवीस तास, अखंड आणि शरीराच्या कोणत्याही अवस्थेत ज्याचे नामस्मरण अतूट टिकते तो संत जाणावा.
*५)  संत  दर्शनाचे फल काय ?*
संत दर्शनाने आपली वासना फळास तरी येते किंवा क्षीण होऊन जाते. दोन्ही दृष्टीनं आपला शेवट गोड होतो.
*६) संतकृपा कशाला म्हणतात?*
संत मनाने जेथे राहतो तेथे मन सहज ठेवण्याची शक्ती अंगी येणे ही खरी संतकृपा होय. संत कृपा ज्याच्यावर होते तो स्वतः संतच  बनतो यात संशय नाही.
*७) संतापाशी शिकावे काय ?*
भगवंताचे अनुसंधान.  संसारातील  नाना प्रकारच्या प्रसंगांमध्ये भगवंताला मनाने कसे चिकटून रहावे ही विद्या संतांपाशीच शिकायला मिळते.
*८) सत्संगाने साधते काय ?*
भगवंताच्या कथा ऐकून "तो मला हवा" अशी खरी तळमळ लागते.  माणूस स्वतः भगवंताच्या गुणांचे वर्णन करू लागतो.  त्यामध्ये रस निर्माण झाल्याने त्याची वृत्ती आपोआप आंत रहाणारया भगवंताकडे वळते.  त्याचे मन नामांत रंगते.
*९) सत्संग मिळण्याचा उपाय कोणता ?*
पूर्वजन्मीचे पुण्यकर्म, भगवंताची कृपा, अखंड नामस्मरण किंवा तळमळीची प्रार्थना यांपैकी एक वा अधिक उपायांनी सत्संग साधतो.  शेवटचे दोन उपाय जीवाच्या आवाक्यात असतात.
*१०) सत्संगाचा अधिकारी कोण ?*
प्रत्येक जीव-पशु, पक्षी,वृक्ष देखील सत्संगाला लायक असतात. सत्संगाने अंतरंगामध्ये बदल घडून येतो.  म्हणून पशूचा देह असला तरी जिवाचे अंतरंग शुद्ध होऊन जाते.  सामान्य माणूस संताच्या सहवासाला राहतो पण त्या संताला आंतून चिकटत नाही.  तसे झाल्याने संत त्याच्यामध्ये उतरत नाही. तरी सत्संग वाया गेला असे कधी होत नाही.  आज ना उद्या त्या जीवाचा उद्धार झाल्याविना रहात नाही.
*११)  साधकाचे मुख्य लक्षण कोणते ?*
कामवासना, पैसा, प्रतिष्ठा आणि काळजी यांचे चिंतन करण्यात वाया जाणारी मनाची शक्ती जो युक्तीने भगवंताच्या चिंतनाकडे वळवतो तो साधक जाणावा.
*१२)  साधकाने काय विसरू नये ?*
भगवंताचे चिंतन, सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण आणि कर्तव्याचे आचरण साधकाने कधी विसरू नये.
*१३)  साधकाने काय स्मरूं नये ?*
पूर्वी आपल्या हातून घडलेले पापकर्म, कामवासनेचा भोग, समाजात भोगलेला मान, होऊन गेलेले पैशाचे नुकसान, मृत्यूने हिरावून नेलेले प्रियजन आणि शरीरास पीडणारा रोग यांचे स्मरण साधकाने शक्य तितके टाळावे.  हे साधले तरच मन नामस्मरणात रंगून जाइल.
*१४)  साधकाच्या आड काय येते ?*
सधकाचे अज्ञान त्याच्या आड येते.  अज्ञानातून अहंकार जन्म पावतो आणि त्याच्या पायी जीव अविवेकाने वागतो.  म्हणून संताच्या सांनिध्यात किंवा सत्शास्त्राच्या चिंतनात
विवेक बळकट करून आपल्या "अहं" ला भगवंताच्या चरणी लीन करावा म्हणजे साधक तरतो.
*१५)  साधकाने सोडावे काय ?*
दुसऱ्याच्या दोषाचा काथ्याकूट करणे, विकारांना सहज वश होणे, अाचारभ्रष्ट होऊन समाजात वावरणे,आपल्या साधनाची टिमकी वाजवणे, फार खाणे,फार निजणे आणि फार बोलणे, तसेच फार काळजी करणे व उगीच वेळ वाया घालवणे या गोष्टी साधकाने
सोडणे आवश्यक आहे.
*१६)  साधकाने साधन कसे सांभाऴावे ?*
आपले जीवन आता फ़क्त भगवंतासाठीच आहे ही पक्की खूणगाठ मनाशी बांधून साधकाने आपला दिवस घालवावा.  संसारातील काही कर्मे करावी लागतीलच.  पण ती नाइलाजाने करावीत, हौसेने करू नयेत. त्यातून उरलेला सगळा वेळ जप, ध्यान, श्रवण-वाचन आणि मनन यांत घालवावा.  रोज थोडा वेळ तरी एकेठायी डोळे मिटून अगदी स्वस्थ बसण्याची सवय करावी.  नंतर नियमाने अभ्यास केला तर मनाचे स्वरूप आपोआप बदलू लागल्याचा अनुभव येतो.
*१७)  साधकाने आपली प्रगती कशी मोजावी ?*
आपल्या देहाचे प्रेम कमी होत जाऊन आपल्यातील काम, क्रोध, लोभ हे विकार बलहीन झालेले अनुभवास येणे हे प्रगतीचे खरे खरे चिन्ह समजावे. तरीपण मनाची शांतता वाढणे, संसारातील भल्याबुय्रा प्रसंगात मनाची समता टिकणे,सारखे नाम घेत राहून श्रीसद्गुरुचे चिंतन करीत बसावेसे वाटणे, दुसऱ्याचे  दोष वा अपराध पोटात घालणे आणि दृश्य वस्तूंबद्दलचे हवेपण क्षीण होणे या लक्षणांवरून साधकाने आपली प्रगती मोजावी.
*१८)  परमार्थ अगदी थोडक्यात सांगा...*
आहे ते गोड करून घ्या, सर्वांशी नम्र व्हा, होईल तेवढे नाम घ्या, " तो (भगवंत ) माझ्या मागे आहे " या विश्वासाने वागा.  यामध्ये सगळा परमार्थ आला.
*१९)  प्रपंचात राहणाऱ्या सामान्य माणसाला परमार्थ कसा साधेल ?*
★ _रोज अगदी नियमाने थोडेतरी नामस्मरण करावे._
★ _आठवड्यातून एक दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगती करावी._
★ _स्वतःच्या किंवा लोकांच्या सांसारिक चर्चा, ऑफीसमधील नित्याच्या घटना, इतर साधकांच्या वागण्याची चिकित्सा, आणि फालतू पुस्तकांचे वाचन मनापासून टाळावे._
★ _कोणतेही वर्तमानपत्र अथपासून इतिपर्यंत वाचू नये._
★ _आपल्या प्रकृतीला सोसेल असा योग्य परिमित आहार घ्यावा._
★ _स्वतः अमानी असून दुसऱ्याला मनापासून मान द्यावा._
★ _आपल्या वागण्यात व साधनात ढोंगाचा लवलेश देखील नसावा._
★ _आपल्या साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकूनदेखील वादविवाद करू नये, कारण दोन्ही फार पवित्र असतात._
★ _व्यवहार न सोडता मनामध्ये संतोषाची वृत्ती बाळगण्याचा अभ्यास करावा._
★ _आपले जीवन अर्थात आपला प्रपंच व परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी._
ही दहा मण्यांची माळ गळ्यात घालून प्रपंच करणाय्राला सहजच परमार्थ साधतो.
*२०)  भक्ति म्हणजे काय?*
आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये, आपल्याशी सम्बंध येणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये, आपल्या जीवनांत घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये भगवंत दिसल्याने मन शांत व प्रसन्न राहणे ही भक्ति.
*२१)  भगवंताचे दर्शन केंव्हा होते ?*
"तो मला भेटावा " अशी उत्कंठा लागून जीवाला चैन पडत नाही, दूसरे काही सुचत नाही तेंव्हा.
*२२)  भगवंताचे दर्शन कसे होते ?*
सामान्यपणे साधकाला ज्या सगुणरूपाची आवड असते, सवय असते, त्याच स्वरूपात त्याला दर्शन होते.  कधी कधी प्रत्यक्ष रूप दिसत नाही पण "तो माझ्यापाशी आहे " अशी निःसंशय प्रचीती येते.  हे दर्शन अधिक वरचे होय.
*२३)   प्रार्थना कोणी करावी ?*
जो - "मनुष्य जन्मास" येतो त्याने.
*२४)  प्रार्थना कशी करावी ?*
शरीराने दीन, मनाने लीन, वृत्तीने क्षीण, अहंकाराने हीन आणि अंतःकरणाने प्रेमाच्या आधीन होऊन करावी.
*२५)  भक्ताचे महत्व कोणते ?*
भगवंत जेवढा मोठा तेवढाच भक्तदेखील मोठा होतो.  इतकेच नव्हे तर प्रेमलीन भक्ताच्या पुढे भगवंत सुद्धा दीन बनतो. गोपीनी त्याला नाचवलाय की नाही !  असा भाग्यवान भक्त विरळा.
*२६)  भक्त कसा असतो?*
संसारातील सगळ्या भोगवस्तु भक्ताच्या अंवतिभोवती वावरतात पण त्याच्या आत त्या शिरत नाहीत. जोपर्यंत त्याची वृत्ती भगवंताकार राहते तोपर्यंत भगवंत त्याच्या नजरेसमोरून हलत नाही.  अर्थात तोपर्यंत भोगवस्तूंकडे त्याचे लक्ष जात नाही.
*२७)  भक्त व साधक यामध्ये फरक कोणता ?*
'माझे अंतरंग मी भगवंताला अर्पण केले ' ही जाणीव जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत तो साधक ;  आणि ती निःशेष विलीन होऊन 'मी नाही फ़क्त तोच आहे' ही भावना स्थिर झाली की भक्त.
*२८)  भक्तांचे काय पाहू नये?*
भक्तांची जात पाहू नये, त्याचे वय पाहू नये, त्याची लौकिक विद्या पाहू नये, त्याचे भाषा ज्ञान पाहू नये, त्याचे शरीर सौंदर्य पाहू नये, त्याच्या नातेवाइकांचे मत पाहू नये, त्याचा प्रपंच पाहू नये.
*२९)  भक्त ओळखावा कसा ?*
दिवस व रात्र जो भगवंताच्या नामांत मस्तपणे राहतो तो खरा भक्त.
*३०)  सगुणाला कसे मानावे ?*
भगवंताची मूर्ति ही साक्षात् भगवंत आहे अशी निःसंदेह  धारणा धरावी.  जो निर्गुण आहे तोच भक्तांसाठी सगुण होतो.
*३१)  कोणाच्या पाया पडावे ?*
संसारात ज्याला एका भगवंताशिवाय दुसरा आधार खरा वाटत नाही आणि ज्याला एका भगवंताच्या नामावाचून काही सुचत नाही तो पाया पडण्यास योग्य समजावा.
*३२)  प्रेम म्हणजे काय ?*
प्रेम केल्याशिवाय ते काय आहे कळत नाही.  तरी आपल्यावर जितका आपला आपलेपणा तितका तो भगवंतावर जडणे हे  प्रेम आहे.

*३३)  नामोंच्चारण आणि नामस्मरण यांत फरक कोणता ?*
वस्तुतः दोन्हींमध्ये फरक नाही.  दोन्ही परावाणीतूनच उगम पावतात.  परंतु नामोंच्चारणामध्ये ती जाणीव नसते तर नामस्मरणात ती जागी राहते.  अर्थात दोन्हीमध्ये नाम एकच असते.  पहिल्यामध्ये अधूनमधून भगवंत मनात येतो तर दुसऱ्यामध्ये तो सारखा ठाण मांडून बसतो.  तरी पहिल्यातूनच  दूसरे आपोआप उदय पावते हे मात्र विसरू नये.  म्हणून नुसत्या नामोंच्चारणाने देखील जिवाचे पाप नष्ट होते असा अनुभव येतो.

Post a Comment

0 Comments