॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -२
अध्याय -२
सिध्द योग्याचे दर्शन-विचित्रपुरीचा वृत्तान्त
मी मरुत्वमलै या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे, थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की, कांही न मागता भोजन मिळत असे. पांडय देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमा क्रमाने कमी होत होते. या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते. त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिध्द योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठया वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ''श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु'' असा तोंडभरून आशिर्वाद दिला. त्यांच्या चरणस्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते. ते महायोगी मला म्हणाले ''तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे''त्याची कथा सुध्दा मोठी रंजक आहे. देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले. परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरूवात केली. तो ध्यानस्थ असतांना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला. या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. पांडय देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतीमान, तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली. इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले. तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. मोठ्या भक्ति भक्ति भक्तीभावाने त्याने त्याचे पूजन-अर्चन केले. नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले. हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून, अत्यंत मंगल दायक आहे. पुण्यवंतांनाच, श्री दत्त प्रभूंच्या भक्तांनाच विनासायास याचे दर्शन घडते. मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रध्दाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच. मला हे मंदिर श्रीमीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले. मी मोठ्या श्रध्देने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिध्दयोगींद्राकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्रीयोगींद्राचा आश्रम मात्र सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनांत चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहिकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करीतच होतो. माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले. माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता. त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवीत होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो. त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता. शेवटी मी कसाबसा श्रीसिध्दयोगींद्राच्या आश्रमात पोहोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काल अदृष्य झाला. श्रीसिध्दयोगींद्रानी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगिश्वरानी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरविला, नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरविला व माझ्या डोळयांनाहीं प्रेमस्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसेच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले.
श्री दत्तमहिमा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा
शअनुग्रह संपादन करण्यास योग्यता
यावेळी सिध्दयोगी म्हणाले ''तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्या नंतर दर्शन घेतलेले श्रीसुंदरेश्वराचे मंदिर, ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्रीदत्तात्रेयांची अनुज्ञा होती. म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली. श्रीदत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देंवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ति, त्या वेळचा परिसर तुला दाखविला. तू पाहिलेली सारी सृष्टी (सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे. सर्व कांही चैतन्यस्वरूप आहे.) श्रीदत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य, वर्तमानामध्ये बदलु शकते, वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना, वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्रीदत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळयाप्रकारे घडण्यास श्रीदत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पति, स्थिती व लय होतो, त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पीठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्यस्वरूप जाणले नाही, परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रध्दा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा प्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहिसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या षड्रिपुतून मुक्त होऊन शुध्द होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही.’’
देवेंद्रांने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांडयास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोध्दार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला ''मधुरानगर'' असे नांव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वरभक्तच् होता. त्याने संतानप्राप्तीसाठी ''पुत्रकामेष्टी'' यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरीत झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र, ऋषिगन अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षीदेवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी, मधुरानगरीतून वहात होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपिक होऊन निसर्ग रम्य झाला होता. श्रीसिध्दयोगींद्र पुढे म्हणाले अरे बाबा ! सृष्टीमधील प्रत्येक वस्तुमधे स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति -व्यक्ति मध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सुक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पाप कर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तीचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ति होते, पुण्यस्थलांचे दर्शन घडते, पुण्य कर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृध्दी होत जाते व पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्रीदत्तप्रभूवर भक्ति जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास.
माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचश्या टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या श्रीसिध्दयोगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो, तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिध्दयोगीच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता काय ? असे नाना विकल्प मनांत येऊ लागले तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोडयाच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्याशिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरीजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृध्द गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढयात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोंचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले. तेवढयात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चारपाच कावळे आले ते माझ्या हातावर, खांद्यावर बसून चोंचीने हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे, मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिध्द पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळयांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले , मी त्या सिध्दयोगींद्रा बद्दल मनांत शंका घेतली होती, त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो, कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो, त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरूवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुऊन, वाळवून, कपडयाचे गाठोडे गाढवावर ठेऊन ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्म वैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळयाचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळया पानांचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरु लागले, तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्रीदत्तप्रभूंचा भक्तच् होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्त प्रभुंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन-गायनाने माझे हृदय श्रीदत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करीत होते. तो म्हणाला, ''माझे नांव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळयाकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुध्दा मला माहित आहे. आपले नांव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो.''
त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिष शास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, ''मी ज्योतिषी नाही. श्रीपीठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेर घर. ''सांगवेदार्थ सम्राट'' अशी पदवी मिळविलेले श्री मल्लादी बापन्ना अवधानलु यांनी सुध्दा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभाचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत, अर्थहीन तर्क-वितर्क करणारे पंडित, श्रीपाद श्रीवल्लभाच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्व जन्मीचे पीठिकापुरम येथील महा अहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले. ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकूळ झाला, तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्या कडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहु शकता.'' परंतु अन्न पाण्यावाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिक्षे सारखी होती. इंद्र पुढे म्हणाला ''हे पंडितांनो तुम्ही पादगये सारख्या पवित्र स्थळी राहून सुध्दा श्रध्दा, भक्ति निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतघ्नतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले.श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीदत्तप्रभुचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल.''
पवल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला ''शंकरभट्टा ! हे कावळे, ते सर्प पूर्व जन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला'' ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबध्द असावा. वैश्यांनी व्यवसाय, व्यापार, गाईचे रक्षण, क्रय विक्रय आदि व्यवहार करावे. शूद्रानी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव इथे नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रध्दा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे.
वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असतांना विष्णूमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास, त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास, तो श्लोक असा होता ''शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम्॥ प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोऽपशांतये.॥''
याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्रीदत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले. शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले . तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला कांही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे.
श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहिसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो.चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गांव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता. परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूइष्ट (यज्ञ कर्मलोप) असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करु लागले होते.
शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद
राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हालविताच ''आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे'' असे म्हणून राजवाडयात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजा समोर उभा राहिलो. मला भीतीने घाम सुटला होता. मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला,'' तेवढयास एवढे तर एवढयाला किती होईल ? मी गंभीरपणे उत्तर दिले ''एवढयाला एवढेच'' माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला ''महात्मन् आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो.'' राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरूवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगीरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्तहस्ताने देत असे. त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणा कडून यजमानांच्या घरी पूजा, अर्चा, अभिषेक आदि करवून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वत: घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुध्दा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण, राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे, लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुध्दा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो ''महाराज राजगिऱ्याची भाजी कितीहि दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, मणि, सोने आदि दान करणे तुझ्या हिताचे आहे.'' माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता.
राजगुरुंनी माझी परिक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे, असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शाविण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखविली. तीन संख्या पहाताच मला दत्तात्रेयांची त्रैमूर्ति आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का, असा प्रश्न वाटला. मी भक्ति ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखविली व भक्ति हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरुंनी गोड पदार्थाचा, मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले, परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात, तुम्ही सुध्दा यांची चव पाहू शकता, असा माझा भाव होता. माझ्या उत्तरांनी राजगुरु अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले ''राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांच्या भाषेत सुध्दा मोठा पंडित आहे.'' दोन परिक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता तिसरी परिक्षा डोळयासमोर भेडसावित होती. राजगुरुंनी सांगितले ''चमक'' मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता ''एकाचमे'' म्हणजे एक. ''तिस्रश्चमे'' म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते. ''पंचचमे'' म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते. ''सप्तचमे'' वर आलेल्या नऊ मध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचा वर्गमूळ चार येतो. ''नवचमे'' म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचविस येतात व त्याचा वर्गमूळ पाच येतो. ''एकादशचमे'' म्हणजे वरील पंचविस मध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येते. ''त्रयोदशचमे'' म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात. ''पंचदशचमे'' म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असता चौंसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते. ''सप्तदशचमे''चा अर्थ वरील चौंसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एकयांशी आणि त्याचे वर्गमूळ नऊ ''नवदशचमे'' म्हणजे वरील एकयांशी संख्येत एकूणीस मिसळले असता शंभर होतात व त्याचे वर्गमूळ येते दहा. ''एकविंशतिश्चमे'' म्हणजे वरील शंभर या संख्येत एकविस मिळविल्यास संख्या एकशे एकवीस होते व त्याचे वर्गमूळे येते अकरा.'' ''त्रयोविंशतिश्चमे'' वरील एकशे एकविस संख्येत तेवीस मिळविले असता एकशे चव्वेचाळीस होतात, त्याचे वर्गमूळ येते बारा. ''पंचविंशतिश्चमे'' याचा अर्थ वरील एकशे चव्वेचाळीस संख्येत पंचेवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात व त्याचे वर्गमूळ येते तेरा. ''सप्तविंशतिश्चमे'' याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तर मध्ये सत्तावीस मिसळले असता एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमूळ येते चौदा. ''नवविंशतिश्चमे'' म्हणजे वरील एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचविस होतात व त्याचे वर्गमूळ पंधरा येते.
''एकत्रिंशच्चमे'' याचा अर्थ वरील दोनशे पंचविस मध्ये एकतीस मिळविले असता दोनशे छप्पन्न येतात आणि त्याचे वर्गमूळ येते सोळा. ''त्रयस्त्रिंशच्चमे'' म्हणजे वरील दोनशे छप्पन मध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोण नव्वद येते, त्याचे वर्गमूळ येते सतरा. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहित होते. परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातुची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वानाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
0 Comments