सिद्धमंगलस्तोत्र

१) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
२) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
३) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
४) सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
५) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
६) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
७) पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
८) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
९) पीठिकापूर नित्यविहारा मधुमतीदत्त मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनाघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात."
  श्रीगुरु श्रीपादराजांचे सिद्धमंगल स्तोत्र: भावार्थ 
श्रीगुरु श्रीपादराजांचा अवतार हा कुटूंबवत्सल दत्तात्रेयांचाच अवतार आहे.
पिठापूर येथील आपल्या १६ वर्षाच्या वास्तव्यात आपले वडील अप्पललक्षी नरसिंहराज शर्मा, आई सुमती महाराणी, आजोबा बापानाचार्य, आजी राजमांबा, मामा श्रीधरावधानी व आपली भावंडे श्रीविद्याधरी, राधा, सुरेखा व श्रीधरशर्मा, श्री नरसिंह शर्मा, कौटुंबिक स्नेही वेंकटप्पा श्रेष्टी व वेंकट सुब्बमांबा, नरसिंह वर्मा व अंमजम्मा यांचे अपार प्रेम मिळाले. या सर्वाबरोबर राहत असताना सर्वांचे श्रीपादराजांना प्रेम मिळत होते ते श्रीगुरूंच्या दिव्य अश्या तेजाने, त्याच्यातील बौद्धिक संपन्नेतेने. प्रत्येक घटनांचे ज्ञान, कर्माने विवरण करून त्याचा अर्थ समजावणे याचे प्रत्येकास कौतुक व आश्चर्य वाटत असे.
श्रीपादराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत हे त्यांच्या जन्माच्या अदभूत व दिव्य प्रसंगावरून सर्वाना लक्षात असले तरी, कुकुटेश्वर मंदिरातील काही ब्रह्मवृन्द व काही परिचित हे मानण्यास राजी होत नसत. त्यामुळे कायमच श्रीपादराजांच्या कुटूंबामध्ये खरेच हे श्रीदत्तप्रभू आहेत का हा प्रश्न पडत असे. सर्व कुटूंबामध्ये श्रीपादराजांना अत्यंत प्रिय अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे आपले आजोबा महापंडित श्री बापानाचार्य. वैदिक होमहवंन, याज्ञीक कर्मे, भविष्य कथन करताना आपल्या सत्यवाणीने, सात्विक आचरणाने सर्व जनाना मदत करण्यात कायमच पुढे असत. पीठापूरमधील इतर ब्रह्मवृंदासारखे दक्षिणेच्या मागे न लागता सर्व गरजूना वेळोवेळी धार्मिक उपदेश, अन्नदान करीत असत. सर्व जनतेचा लोभ असल्याने त्यांना सत्यऋषीश्वर असे ही म्हणत असत. श्रीपादराज दुसऱ्या वर्षांपासून श्री बापानाचार्य यांच्या कडेवर बसून गावात फिरत असत. वेळोवेळी आपल्या नातवाची श्रीपादराजांची अनुभूती श्री बापानाचार्याना मिळत होती. आपल्या नातवाचे लाडिक असे श्रीहरीचेच रूप दररोज ते डोळ्यात साठवीत होते.
एकदा श्रीपादराजाच्या वाढदिवशी (भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीस) श्री बापानाचार्य आपल्या लाडक्या श्रीपादराजास मांडीवर घेऊन बसले असताना त्यांनी चरण कुरवाळले. त्या तेजस्वी पाऊला मध्ये त्यांना शुभचिन्हाची मालिका दिसली. त्यांनी आपल्या नातवाच्या चरणांचे चुंबन घेतले आणि श्रीदत्तप्रभूंचे दर्शन झाले. श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाने त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटना ही स्पष्ट दिसू लागल्या. त्यांनी लाडक्या श्रीपादराजांच्या कौतुकाचे कवन गाण्यास सुरुवात केली. हेच ते सिद्धमंगल स्तोत्र आहे.

Post a Comment

0 Comments