II श्री स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत II अध्याय -१०

नरसिंह मूर्तीचे वर्णन
मी तिरुमलदासांची आज्ञा घेवून कुरवरपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरु केले. श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंग रोमांचित होई. मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो. जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो. त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले. जवळ जाऊन पाहीले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीत धारण केलेले होते.
मी अश्वत्थाजवळ गेलो तेंव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले. त्यांचे नयन करूणारसाने भरले होते. त्यांच्या समोर एक झोळी होती. त्यात खाद्य पदार्थ काही नव्हते. परंतु एक ताम्र पात्र तेवढे होते. ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम स्मरण करीत होते. मी त्यांना प्रश्न केला ''महाशय ! आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का ? तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का ?''
ते म्हणाले ''माझा जन्म सद्वैश्य कुलात झाला असून मला सुब्बय्या श्रेष्टी असे म्हणतात, आमच्या वंशाचे नाव ''ग्रंथी'' आहे. आमच्या पूर्वजा पासून सद्ग्रंथ पारायणाची परंपरा आहे. म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले. माझ्या लहानपणी मला माता-पित्याचा वियोग झाला. माझ्या घरी धन समृद्धी आहे. मी दूर देशांस जावून अनेक प्रकारचे व्यापार करतो. या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरास जाण्याचा योग आला. तेथे चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला. खूप धन तिच्यावर खर्च केले. मळयाळ (केरळ) देशात पालक्काड या प्रांतातून बिल्वमंगल या नावाचा ब्राह्मण सुध्दा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे. तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांजकडून रत्नराशी व तुरंग (घोडे) घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघे जण मिळुन व्यापार करीत होतो. दुर्दैवाने, आम्ही दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो.'' अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला. त्या नंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेवून निम्नजातीचे घोडे आम्हांस दिले जेणे करून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले. आमच्या कडून चांगले घोडे, राजे महाराजे विकत घेत. व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली. माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली. मला एक मंदबुध्दी असलेला पुत्र होता. त्याचा अकालमृत्यू झाला. बाबारे ! सगळया तीर्थांत श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थ क्षेत्रात असलेले पीठिकापुर आमचे मूळ गांव. मी अज्ञानी असताना देव-ब्राह्मणांचे अनिष्ट करीत होतो. ऋण वसूली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो. श्रीपादांचे पिता श्री आपळराजांच्या घरी आईनविल्लीहून त्यांचे बंधूगण भेटण्यासाठी आले. त्या सगळयांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेशे धन नव्हते. ते दानाचा स्वीकार करित नसत. श्री वेंकटप्पय्या श्रेष्टींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदर निर्वाह व उचित व्यवहार करित. श्रेष्टींचे कुल पुरोहित असल्या कारणाने, भिक्षे ऐवजी धनाचा स्वीकार करित नसत. नाइलाज म्हणून त्यांनी एक वराह येवढया रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले. बंधूगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे आपळराजांस मी बजावले होते. हातांत एक कवडी पण नाही मला जेंव्हा धन मिळेल तेंव्हा मी अवश्य परत करीन असे राज शर्मा म्हणाले. मी चक्री-व्याज घेण्यात तरबेज होतो. काळ लोटला. व्याजावर व्याज चढवून खोटे हिशेब दाखवून 10 वराहा देणे बाकी आहे असे राज शर्मास कळविले. तेवढे धन मला देण्यास राज शर्मांना आपले राहते घर विकावे लागले. त्या काळातल्या दरा प्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना 1-2 वराहा दील्याने हिशेब बरोबर असे मी अनेकाना सांगितले होते. राजशर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता. माझा हा दुष्ट विचार लक्षात येताच वेंकटप्पयांनी माझी निर्भत्सना केली. ''अरे दुरात्म्या ! धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस. आमच्या कुल पुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्या सारखे. तू तुझी वागणुक बदल नाही तर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राज शर्मांस तू असले कष्ट देतोस या कारणाने रौरवादी नरकास जाशील.''
एकदा श्रीपाद श्रेष्टींच्या घरी असताना मी श्रेष्टींना व्यंगाने म्हणालो-राज शर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वत: चाकरी करण्यास यावे. एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू, तिसरा हा श्रीपाद मात्र. तीन वर्षाचा माझे ऋण कसे बरे फेडले जाईल ? असे ऐकून श्रेष्टींचे मन दुखावले. त्यांच्या नेत्रांतून अश्रूधारा वाहू लागल्या. श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसून म्हणाले ''आजोबा ! मी असताना भय कसले ? हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपांचा संहार मीच केला तर सुब्बय्याचे ऋण फेडण्यास मला कठीण काय ?'' असे म्हणून माझ्याकडे वळुन म्हणाले ''अरे ! तुझे ऋण मी फेडीन. चल तुझ्या दुकानात. दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन. ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही. विचार कर.''
बाल श्रीपादाना घेऊन वेंकटप्पय्या श्रेष्ठी सुब्बय्याच्या दुकानात आले. ते सुब्बय्यास म्हणाले ''श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो चालेल का ? सुब्बय्याने नकारार्थी मान हालविली इतक्यात दुकानात एक जटाधारी आला. तो सुब्बय्या श्रेष्टींचे दुकान शोधित होता. त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यावयाचे होते. तो श्रेष्टींना म्हणाला'' मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे. किमत थोडी जास्त असेल तरी चालेल. सुब्बय्याच्या दुकानात बत्तीस तांब्याची पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला ''माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे त्याला दहा वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र वेंकटप्पय्या श्रेष्टींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्याशास द्यावे. त्या अटी प्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र त्या संन्याशास दिले. श्रीपाद प्रभु पात्र देताना हसत होते. ते म्हणाले '' अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना ? तुझ्या घरी लक्ष्मी स्थीर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा ! तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पहात आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला. वेंकटप्पय्या श्रेष्टी आणि अप्पळराजू शर्मा यांचा अपमान करावा अशी सुब्बय्याची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यांतच तो म्हणाला, ''आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला. अप्पळराजू कडून यायचे असलेले दहा वराहाचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले. या क्षणी श्रीपाद राय ऋणातून मुक्त झाले.'' वेंकटप्पय्या म्हणाले, ''हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग.'' सुब्बय्याने तसे केले. श्रीपाद प्रभु आणि वेंकटप्पय्या श्रेष्टी घरी गेल्यानंतर सुब्बय्याने आत जाऊन पाहिले तर एकतीस भांडयापैकी केवल एकच भांडे तेथे होते. श्रीपाद प्रभुच्या लीला अनाकलनीय, अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे. साक्षात् दत्त प्रभुंच्या करकमलानी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता. श्रीपाद प्रभुंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांबे असलेल्या धातुचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते तेंव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळविणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुब्बय्या किती दुर्दैवी त्याला येणे असलेले दहा वराहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लीलेने दिले परंतु त्या क्षणापासून त्याच्या कडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली. एकतीस भांडयांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते. सुब्बय्यांने अप्पळराजू कडून दहा वराह येणे आहे असा खोटाच हिशोब दाखविला होता. त्या पापाचे फल अशा स्वरूपात त्याला मिळाले होते.
शंकरभट्ट म्हणाले ''अरे सुब्बय्या सूर्योदयापुर्वीचा आणि सूर्यास्तापुर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो. प्रात:संध्येच्या समयी आणि सांयसंध्येच्या वेळी अग्नीहोत्र करणे विशेष फलदायी असते. प्रात:काळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्त्रोताने सिध्द असतात. संध्यासमयी या सर्व शक्ति पुनरपि सूर्यात विलिन होतात.''
यावर सुब्बय्या म्हणाला ''महाराज ! दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते. परंतु ते स्विकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही. तसेच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार असे म्हणतात तेच नरसिंह स्वामींचा अवतार शंकराचा अवतार असे काहीजण म्हणतात. शिवामध्ये अनुसयेचे तत्त्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही. कृपया या सर्वांचा खुलासा करावा. परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्या अगोदर सर्वाना भूक लागली असल्याने जेवणाचा बेत ठरला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्यांच्या भांडयाशिवाय दुसरे काहीच नव्हते. दोन केळीची पाने सुब्बयांने आणली. शंकरभट्ट नदीवर जाऊन शुचिर्भूत होऊन आले. जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वरणाचा बेत होता. केळीची पाने जेवणासाठी घेतली व पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले. त्या जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या ताब्यांच्या पात्रातूत द्रोणात पाणी टाकले. त्यानंतर त्याच भांडयातून दोडक्याचे चवदार वरण वाढले व नंतर भात वाढला. ते अमृता समान जेवण करून आम्ही तृप्त झालो. रिकाम्या भांडयातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक दैवी चमत्कारच होता. भोजनानंतर ते भांड रिकामेच होते.''
शनीवार प्रदोषसमयी केलेल्या शिवार्चनाचे फलित
श्रीपादस्वामी सकल देवता स्वरूप आहेत. शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहामधील छायाग्रह राहू-केतूतील राहू, शनिमुळे फल देतो. केतू मंगळामुळे फल देतो. कर्मकारक असणारा शनि कर्म साक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सांयकाळ शक्तिमान असते चतुर्थी आणि त्रयोदशी राहुस बलवान असतात. शनित्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधन केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्वग्रह दोषाचे शमन होते. युध्द, आपदा, शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू , ऋणग्रस्ततेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो. चित्रानक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुणवर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. कर्ज म्हणजे पाप. अऋण म्हणजे पाप नसणारा (पाप राहित). त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात. वेंकटप्पय्या श्रेष्टी, नरसिंह वर्मा, आणि बापनार्युलु, शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत. त्या दिवशी अप्पळराज शर्मा यांनी सुध्दा मोठ्या श्रध्दाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता. अखंड लक्ष्मी सौ. सुमती महाराणी शिव स्वरूपातील अनुसयामहातत्त्वाचे ध्यान करीत असे. त्या महातपाचे फलस्वरूप म्हणूनच श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणाने वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा अथवा बापनार्युलु कडून धन स्वीकारले ते दान होत नाही. परंतु त्यांच्या कडून धन न स्विकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते. श्रीपाद प्रभु सकल देवतांचे स्वरूप आहेत. सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्त्व आहेत. त्यांचे दर्शन, स्पर्श, आणि संभाषण ज्या भाग्यवतांना लाभले ते धन्य होत.
श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पीठिकापुरम गावात दावानलासारखी पसरली. तीन वर्षाच्या श्रीपादांनी अप्पळराजूंना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्र स्नेहाने अश्रुधारा वाहू लागल्या. महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून किती तरी वेळ तन्मय अवस्थेत होती. या वेळी त्यांच्या घरी वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापनार्य आणि सुब्बय्या आले होते. सुब्बय्याने सर्व वडिलधाऱ्या मंडळीसमोर श्री राजशर्माचे ऋण (देणे) फिटले असे सांगितले. यावर श्रीपाद प्रभु म्हणाले ''पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो.'' कोणीतरी जटाधारी येऊन दहा वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राजशर्मांनी विचारले. अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या. बापनार्युलुंनी श्रीपादांना विचारले की ''ते जटाधारी संन्याशी कोण होते ते तुला माहित आहे का ?'' यावर श्रीपाद म्हणाले, ''त्या जटाधारी बद्दलच नाही तर सगळया जटाधारी संन्याशांबद्दल मी जाणतो.
श्रीपाद स्वामी कोण ? आणि त्यांचे स्वरूप
बापनार्युलु श्रीपादांना म्हणाले ''तू तीन वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसा सारखा बोलतो आहेस. सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय ?'' यावर श्रीपाद म्हणाले, मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो. प्रलयानंतर सुध्दा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्या शिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिति आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो. यावर बापनाचार्युलु म्हणाले. ''श्रीपादा ! लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा. सर्वज्ञान, सर्वव्यापकत्व, सर्वशक्तित्व हे केवळ जगन्नियंत्याचे लक्षण आहे.''
यावर श्रीपाद म्हणाले ''मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्त्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात नसलो तर मी नाही असे होत नाही. जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोषात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोषांचे सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोषात आहे अशी अनुभूति तुला दिली तर त्या कोषात मी असल्याची जाणीव होते. मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तेथे नाही असा मात्र होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सर्वसृष्टी निर्माण झाली. मी सर्वशक्तिमान आहे. यात आश्चर्य काय आहे ? यावर अप्पळराज शर्मा म्हणाले'' बाळा, बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस. तू पुन्हापुन्हा, ''मी दत्तप्रभु'', ''मी दत्तप्रभु'' असे म्हणतोस ''नृसिंहसरस्वती'' या नावाने पुन्हा एकदा अवतरीत होईन असे म्हणतोस. लोक तर कावळे आहेत. पीठिकापुरम मधील ब्राह्मण तर नरकलोकातील लोखंडी कावळयांपेक्षा सुध्दा भयंकर आहेत. ते या सगळयाला मनचांचल्य आणि बुध्दिभ्रष्टता असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे. या खेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत अस ते मानतात.यावर श्रीपाद प्रभु म्हणाले ''तात, आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना ? पंचभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभु नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का ? नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का ? सत्य देशकालाबाधित असते. आपल्या पीठिकापुरम मधील ब्राह्मण स्वत: देहधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्या प्रकारे मी सुध्दा सर्वज्ञत्व, सर्वशक्तित्व , सर्वांतर्यामित्व असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखे, पदोपदी सर्वाच्या अनुभूतिस आणून देत आहे. युगामागून युगे जाऊ शकतात. अनेक जगत, सृष्टी स्थिती, लयाला जाऊ शकतात. परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल ?''
यानंतर बापनार्युलु म्हणाले ''श्रीपादा ! जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुब्बय्याकडे असलेल्या एकतीस तांब्यांच्या भांडयापैकी एकच उरले. तू काही चमत्कार करून ते अदृष्य केलेस काय ?'' यावर श्रीपाद प्रभु म्हणाले सर्व घटना काळाच्या, कर्माच्या अनुसार कोणत्यातरी कारणाने घडत असतात. कारणा शिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुल्लंघनीय नियम आहे. हे सुब्बय्या पुर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते. परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन क्वचितच घेत असत. त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती. स्त्रीलोलुप असणारा हा पूजारी प्राचीन कालातील पूर्वपरंपेरतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. त्या प्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाम मार्गाने खर्च केले. लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरविले. जटाधारी बनून आलेला संन्याशी पुर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता. त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळविले होते. या जन्मी तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्षे केल्याच्या पुण्याइने त्या पुजाऱ्यास श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला. या दोघांनी ती मूर्ती विरघळऊन त्याचे बत्तीस तांब्याचे भांडे बनऊन विक्रय केला होता. त्या सोनाराच्या घरी नरसिंह देवाची आराधना करत असत. नरसिंह देवाच्या मूर्ती समोर ही तांब्याची भांडी घडवली होती. दैवाच्या संकल्पाने नृसिंहाच्या बत्तीस अवताराच्या अंशानी त्या तांब्याच्या भाडयांत प्रवेश केला होता. या जन्मात पूर्व जन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तीभावाने सेवा केली. त्याची दारिद्रय दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पीठिकापुर येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांडयाचा स्विकार करण्यास सांगितले होते. तसेच दहा वराह श्रेष्ठीला देऊन मला बांधविमुक्त कर असे सांगितले होते. तो तसे करून धन्य झाला. त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशिर्वाद दिला होता. त्याच्या देणेदाराचा त्रास चुकविण्यासाठी त्याने जटाधारी संन्याशाचा वेश घेतला होता. मला जटाधारी बद्दल सर्वच माहिती आहे ना ? हा सुब्बय्या श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने दहा वराह वसूल करून घेणार होता. त्याला दहा वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली. परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्य फल नष्ट झाले. हे सुब्बय्या ! चिंतामणी बरोबर तू केलेले तुझे सर्व श्रुंगार चाळे मला माहीत आहेत. तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल. तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदर निर्वाह चालवशील. तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या माता पित्याने त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तुझ्या पेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो. जेवणातील वरणभात व दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते. तुला अन्नान्न दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी, वरणभात व दोडकेच प्राप्त होतील. ते तू खाऊन इतराना खाऊ घालण्या इतपतच मिळतील.'' असे श्रीपाद प्रभु तीव्रतेने म्हणाले. श्रीपाद प्रभूंचे मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळंयाप्रमाणे लाल दिसत होते. ते पुढे म्हणाले ''ए सुब्बय्या श्रेष्ठी ! आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाज्या जवळ एक म्हैस येईल. तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तो निरोप आहे. मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे. तू स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल. त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर. ते अन्न खाल्यावर तुझ्या ऐवजी ती म्हैस मरून जाईल. परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील. तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर. त्यानंतर तुझी अन्नान्न दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांडयाचा तुला उपयोग होईल.'' असे कडक शब्दात श्रीपाद प्रभु म्हणाले. त्यावेळी वेंकटप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादाना पाहून भयभीत झाले. त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते. तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''आजोबा ! घाबरलात का ? मी नरसिंह मूर्तीच आहे. तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे. वाणी कुळातील लोकांना शाप देईन असे आपणास वाटले काय ? माझी बहीण वासवीने तिच्या कुलातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटि असण्याचा शाप दिला होता. मी श्रीपाद त्याच तत्त्वाचा ! सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भिती वाटली काय ? आपण घाबरू नका दैवाला जातकूळ असे कांही नसते तसेच भक्तांना सुध्दा जाती कुल नसते. आर्य वैश्यांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे. बापनार्य पुर्वीचे लाभाद महर्षीच ना ? वाण्यांमध्ये लाभाद महर्षी गोत्र नष्ट झाले आहे. बापनार्याच्या सर्व वंशजाना (अगदी कली युगाच्या अंतापर्यंतच्या) माझे आशिर्वाद आहेत. त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील. तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे. त्यात दत्त मिठाई भरून आहे. कितीही दिली तरी कमी होत नाही. परंतु ती कोणाला डोळयानी दिसणारी नाही. नृसिंहाच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझ्या ठयी विराजमान आहेत. बापनार्याची तेहतीसावी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महा संस्थानाचे निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्रेयांचे श्वान अदृष्य रूपात त्यांचा सांभाळ करतील. वेद, पुराण, उपनिषदे ही सर्व श्वान रूपात अदृष्य असून सदैव रक्षण करतील. इतक्यात वेंकटप्पय्या श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले. त्यांच्या डोळयातून आनंदाश्रु वाहू लागले. बापनार्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. सुमती माता हे सर्व स्वप्न आहे का वैष्णवी माया अशा संदेहात पडली. अप्पलराज शर्मांचे मन स्तंभित झाले. श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्याच्याकडे भीत भीत बघत होते हा आमचा धाकटा भाऊ की दत्त प्रभू ? ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले.
नरसिंह वर्मांनी श्रीपादाला आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद वर्मांना म्हणाले ''आजोबा आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पहाण्यास जाऊ या. तेथील भूमाता मला कित्येक दिवसापासून तुझ्या पादस्पर्शाने मला पावन केंव्हा करणार ? अशी आर्ततेने प्रार्थना करते आहे.'' ''आर्तत्राण परायण'' हे माझे वचन आहे. तेंव्हा वर्मा म्हणाले, ''अरे श्रीपादा, माझे एक छोटे सांगणे आहे. आपल्या पीठिकापुरम जवळ आमची जमीन आहे ना ? तेथेच एक छोटे गांव वसवून तेथील लोकांकडून शेती करवून घ्यावी. गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमिनदारीचा व्यवहार पहाण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णीपद द्यावे असा माझा विचार आहे. परंतु सध्या हे कुलकर्णीपद आपल्याकडे नाही ना ?'' यावर श्रीपाद हसून म्हणाले ''आजोबा तुम्ही तुमच्या जमिनदारीचा विचार केला परंतु माझ्या जमिनदारीचा विचार नाही केला. हे मला मान्य नाही. अगोदर वडिलांना कुलकर्णी पद करा म्हणाव. त्यानंतर तू कुलकर्णीपद संभाळायच आहे असे वर्मा म्हणाले. घंडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभ राजशर्मा अमुक गावाचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील. जे कुलकर्णीपण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशोब मला आहेत. दररोज कोटयावधी पुण्य राशींची उलाढाल होताना दिसत आहे. माझ्या अवताराचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलऊन टाकायचे आहे. मानवात असल्या प्रमाणे गावाला, शहराला, पुण्य क्षेत्रांना सुध्दा कुंडलिनी असते. सांध्र सिंधुवेद यांचे ज्ञान ज्यांना आहे अशानाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे. पीठिकापुरची कुंडलिनी बापनार्युलु, वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्सवायी यांच्या तेहतिसाव्या पिढीमध्ये जागु शकते,आत्ताच काय घाई आहे ? दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा.''
श्रीपाद प्रभूंचे वैभव
माझ्यात अज्ञान जवळ जवळ भरलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, ''मी स्वत: श्रीकृष्ण आहे'' असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला ''श्रीपादा ! तू स्वत:ला श्रीकृष्ण म्हणवतोस तर अष्टभार्या सोळा सहस्त्र गोपिका सुध्दा या अवतारात आहेत काय ?'' यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले ''माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत. या माझ्या शरीरातून दशादिशांमध्ये शक्तीस्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर, मन आणि आत्मतत्वामधून (10x10x10 = 1000) एक हजार स्पंदने प्रवर्तित होतात. या प्रकारे सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत. पूर्वावतारात त्या सर्व कला मानवरूपात अविर्भुत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळया निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात कांही चूक नाही. ती माझीच आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णूरूप, आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते. या प्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात. वेगवेगळया साधन पध्दती, साधकाच्या विविध साधनाअवस्था, काल, कर्म, कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात.
नरसिहांची 33 रूपे
नरसिंह राजवर्म्याला त्या रात्री नृसिंहाने तेहतीस रूपात दर्शन दिले होते. ती रूपे अशी - 1) कुंदपाद नरसिंह मूर्ती 2) कोप नरसिंह मूर्ती 3) दिव्य नरसिंह मूर्ती 4) ब्रह्मांड नरसिंह मूर्ती 5) समुद्र नरसिंह मूर्ती 6) विश्वरूप नरसिंह मूर्ती 7) वीर नरसिंह मूर्ती 8) रौद्र नरसिंह मूर्ती 9) व्रूच्र नरसिंह मूर्ती 10) बिभीत्स नरसिंह मूर्ती 11) धूम्र नरसिंह मूर्ती 12) वह्नि नरसिंह मूर्ती 13) व्याघ्र नरसिंह मूर्ती 14) बिडाल नरसिंह मूर्ती 15) भीम नरसिंह मूर्ती 16) पाताळ नरसिंह मूर्ती 17) आकाश नरसिंह मूर्ती 18) वक्र नरसिंह मूर्ती 19) चक्र नरसिंह मूर्ती 20) शंख नरसिंह मूर्ती 21) सत्व नरसिंह मूर्ती 22) अद्भूत नरसिंह मूर्ती 23) वेग नरसिंह मूर्ती 24) विदारण नरसिंह मूर्ती 25) योगानंद नरसिंह मूर्ती 26) लक्ष्मी नरसिंह मूर्ती 27) भद्र नरसिंह मूर्ती 28) राज नरसिंह मूर्ती 29) वल्लभ नरसिंह मूर्ती. या नंतरच्या तीसावे नरसिंह मूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिले. 31 व्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती अवतारात आणि 32 व्या नरसिंह मूर्ती रूपात प्रज्ञापुरचे (अक्कलकोटचे) स्वामी समर्थ यांना पाहिले.
शश्रीनिवासांचा वृतांत
शकन्या मासामध्ये श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिध्दयोगावर श्रीवेंकटेश अर्च्य रूपात प्रकट झाले. वैशाख शुध्द सप्तमीला विलंबी नाम संवत्सरा मध्ये त्यांनी कुबेरा कडून धन सहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले. श्री पद्मावती देवी मृगशीरा नक्षत्रावर जन्मली. तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले. वैशाख शुध्द दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला. श्रीनिवास प्रभू सुध्दा भारद्वाज गोत्रा मध्ये अवतरले. पांडवाच्या वंशातील सुधन्वाला नागकन्ये द्वारा झालेला पुत्र आकाश महाराज. याचा भाऊ तोंडमान. वसुधानु हा आकाश महाराजांचा मुलगा. श्रीनिवास प्रभूनी अगस्ती महर्षीच्या सल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला दिले व अर्धे राज्य वसुधानुला वाटून दिले. त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभुंच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले. दुसऱ्या दिवशी श्रीपादाच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुब्बय्या श्रेष्ठी जवळ असलेल्या कुटीमध्ये शंकरभट्टास घेऊन गेले. त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया होत्या. चार कुत्रे त्या कुटीचे रक्षण करीत होते.
श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ
श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लीलांच्या केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार ॥

Post a Comment

0 Comments