सुब्बय्याश्रेष्ठी, चिंतामणी, बिल्वमंगल यांचा वृतांत
दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म - अत्यद्भुत ज्योतिर्मय
दुसऱ्या दिवशी सकाळी सुब्बय्या श्रेष्ठीनी सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले ''श्री दत्त प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत. दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते. सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंर्तभूत आहेत. श्री सुमती माता अनसूया तत्त्वामधील परमशिवाची शनि प्रदोष समयी आराधना करीत असे. त्यामुळे श्री दत्त प्रभूंमधील शिवतत्व अनसूया तत्त्वात प्रतिबिंबित होऊन अनसूया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले. ही एक अद्भुत योगप्रक्रियाच होती. मातापित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पळराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योती रूपाने ते बाहेर प्रकटले. वास्तविक पहाता श्रीपाद ज्योतीस्वरूपच होते. त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्य कारक लीला करण्यास सुरवात केली. कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहिण झाली. तिचे विद्याधरी असे नांव ठेवले होते. विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापनाचार्युलुचे एक दूरचे बंधु मल्लादी रामकृष्णावधानुलु नांवाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले. त्यांना चंद्रशेखर नांवाचा एक मुलगा होता. घंडीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीच जन्मली. ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकांत मुक्तकंठाने सांगू लागले. श्रीपाद प्रभूंना सुध्दा हे नाते पसंत होते. त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पीठिकापुरम मध्ये संपन्न झाला.''
श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला. तिचा विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलु या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला. राधानंतर श्रीपाद प्रभुना अजून एक बहिण झाली. तीचे नांव सुरेखा असे होते. तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलु नावाच्या एक विद्वान सच्छील युवका बरोबर झाला.
श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत. त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते. गोदावरी मंडलात, ताटंकपूर (तणुकु) नावाचे गाव आहे. तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परम पवित्र असा एक वंश आहे. ते वाजपेय याजी आहेत. पीठिकापुरम मधील मल्लादिंचा आणि वाजपेय याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेय याजी ''इदं ब्रहम्य मिदं क्षात्रम्'' या सिध्दांतावर विश्वास ठेवणारे आहेत. ते वशिष्ठ, शक्ति , पराशर ऋषि प्रवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते. कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम गुरु नव्हते. त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेय याजी मायणाचार्युलु यांना बोलाऊन होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले. तेंव्हा पासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले. यांनी ब्राह्मणवृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली. सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. मायणाचार्याना दोन पुत्र होते. एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य. हे दोघे महान पंडित होते. सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले. माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले. ''विशेष कृपा कटाक्षाची'' याचना केली. तेंव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ''ते या जन्मात साध्य होणार नाही.'' तेंव्हा माधवाचार्य म्हणाले ''माते ! मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो. त्या नंतर देवीने हवा असलेला वर दिला. या वराच्या योगाने लोखंडास स्पर्श करताच त्याचे सोने होत असे. त्यांचेच संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्यस्वामी असे होते. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता. यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात - नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्य वाणी केली होती. त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वशांत गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील. ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्री पद सुशोभित करतील. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारी कडे प्रशंसा होईल. ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्य संकल्पच होता. अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते. ते साधकाच्या अभीष्टाची परिपूर्ती करते. दत्तप्रभूंचा आश्रित असणारा, ज्या दैवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावयाचे हे दत्तप्रभूंच ठरवित असतात. ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले. त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले. श्रीदत्तप्रभू सगुणतत्त्वाच्या, निर्गुणतत्त्वाच्या अतीताच्या आधाराचे परमतत्त्व तेच, चरमतत्त्व तेच, आदितत्त्व तेच, आदि अंतरहित तत्त्व तेच आहेत. हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते. शब्दांनी समजाऊन सांगण्याचा हा विषय नाही. एखादे काम होणे किंवा न होणे, दुसऱ्या पध्दतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे.''
श्रीपादतत्व
श्रीपाद श्रीवल्लभ स्वत: त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नि शमन दत्त यांची आराधना करीत असत. एकदा बापनार्युलुनी श्रीपादांना या विषयी विचारले. ते म्हणाले ''श्रीपादा ! तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस ? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले'' मी दत्त म्हणतो तेंव्हा मी दत्तच असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेंव्हा दत्त उपासकच असतो. मी श्रीपाद वल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हेच माझे तत्त्व.'' आजोबाना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते. श्रीपाद पुढे म्हणाले ''तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील जन्मात अगदी तुमच्या सारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे. तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही. तंतोतंत तुमच्या सारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्म बंधने, वासना यांचा नाश करण्याचे मी ठरविले आहे.'' श्रीपादांनी, आजोबांच्या भ्रुमध्यात स्पर्श केला. ते कूटस्थ चैतन्याचे स्थान आहे. त्याना कांही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. ते कांही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले. ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलिन झाले. त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले. त्यांना बापनार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापनार्यांना दिसले. मातेच्या मांडीवरील बाळ पहाता पहाता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरीत झाले. त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहुब बापनार्या सारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती. दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले. तो संन्यासी बापनार्यांकडे वळून म्हणाला ''मी कोण आहे या विचारात असल्या सारखे दिसत आहात. मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे'' असे म्हटल्यावर कांही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले. तेथील कर्दळीवनातील महापुरुषांनी, महा योग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी, महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतका पासून तप केले होते. प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपीनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनार्युलुवर रोखून धरली. ते पुढे म्हणाले ''ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोडया वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ति वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला. महापवित्र अत्यंत शक्तीवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरात आवाज आला ''बापनार्या ! तू धन्य आहेस. अनंत, केवल अज्ञान स्वरूप, अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ति योगामुळे सूर्य मंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो. या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि अध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे.'' असे शब्द बापनार्याना ऐकू आले. या प्रसंगाने बापनार्युलु स्तब्धच झाले. त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला. त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधूर होते. त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले. त्या वेळी तेदव्य तन्मय अवस्थेत गेले. तसा किती वेळ गेला ते कळलेच नाही. डोळे उघडले तेंव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते त्यासाठी उठले , बापनार्यांचे अग्निहोत्र कार्य सुध्दा अभिनव होते. शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नि निर्माण करतात, परंतु बापनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून अग्नि निर्माण करीत. अप्पलराजू शर्मा सुध्दा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत. त्यांच्या वंशात अग्निपूजा होती. प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत. हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत. या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्राना व शरीरास कोणताही त्रास होत नसे. हे महद आश्चर्य होते.
श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य
बापनार्युलुनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नि कांही प्रज्वलीत होईना, ते घामाने ओले चिंब झाले परंतु अग्नि मात्र निर्माण झाला नाही. श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली. ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले ''अरे अग्निदेवा ! तुला आज्ञा करतो. आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस.'' अग्नि तत्काळ निर्माण झाला. बापनार्युलुनी कलशातील पाणी अग्नि कुंडात घातले परंतु विझण्या ऐवजी अधिकच भडकला. आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले. श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा, माझ्या अवताराला तुम्ही, वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, कारण आहात. म्हणून तुम्ही, माझ्या वडिलानी वेंकटप्पय्या कडून, नरसिंह वर्माकडून धनसाहाय्य किंवा धनेत्तर साहाय्य स्विकारल्यास ते दानामध्ये येत नाही. त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैव द्रोह सुध्दा होऊ शकतो. त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी. मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी, मल्लदीचीच नव्हे तर वेंकटप्पय्या श्रेष्ठी, वत्सवाहीं कुटुंबाची माहेरवासिण आहे, असे समजावे. हा माझा दंडकच आहे. श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा तेथेच होते. तसेच श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा सुध्दा तेथे होते. या वेळी श्रीपाद प्रभू म्हणाले ''माझ्या संकल्पाशिवाय बापनार्यासारखे महा तपस्वी सुध्दा अग्नि निर्माण करू शकत नाहीत. माझे वडील अग्निकुंडांत आल्यावर अग्नि आपला प्रताप दाखवितो. माझा संकल्प जर बदलला तर वेंकटप्पय्या श्रेष्ठी सुध्दा निष्कांचन होतील. अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्याना उभे राहण्यापुरती सुध्दा जागा मिळणार नाही अशी त्यांची अवस्था होईल. तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात. मी भिकाऱ्याला महाराजा करू शकातो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ति करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो. परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पहातो. त्याच्या शक्ति सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही या बद्दल मी त्याची परिक्षा करतो. मला गरज भासेल तेंव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. बापानार्युलु कृतयुगात लाभाद महार्षि असताना त्यांचा मंगल महर्षि नावाचा एक शिष्य होता. तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्या रक्ताची गाठ होऊन, सुगंधित विभूती मध्ये ते बदलेले. अहा ! मी किती मोठी सिध्दी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला. एवढयात परम शिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले. त्यांनी स्वत:चा हात हलविला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती. परमशिव म्हणाले ''त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम सवितृकाठकायन यज्ञ करणार आहेत. त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूती पैकी केवळ लवमात्र तुला दाखविले. एवढयाने मंगलमहर्षीचा गर्व पार गळून पडला. श्रोतेगण, अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले. श्रीपाद म्हणाले, ''ह्या पीठिकापूरच्या परिसरात पाउल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्य फल आहे. माझ्या या अवतार समयी तुम्ही माझ्या बरोबर असणे, न सांगता येण्यासारखे विशेष आहे. माझी शक्ति अनुभवाला, प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे. तेंव्हाच माझी शक्ति , करूणा, वात्सल्य, रक्षण, पापविमोचन तुम्हास अनुभवास येईल. माझी जन्मभूमी असलेल्या या बापनार्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पीठिकापुरम मध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दुध पिईन. दुपारच्या वेळी आई मला दुध भाताचे मधुर असे घास खाऊ घालील. रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल. मी पीठीकापुरम मध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेन. दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन. अंर्तदृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल. माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे. महापुरुष, महायोगी, सर्व देशांतील लोक मुंग्यासारखे हजारोच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील. ते दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील. मी काल पुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्ये क्षणात घडतील. माझ्या नावाने एक महा संस्थान निर्माण होईल. माझा प्रभाव जसाजसा वाढत जाईल तसे तसे पीठीकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील. विक्रीसाठी थोडी सुध्दा जागा शिल्लक राहणार नाही. मला ज्यानी येथे यावे असे वाटेल त्याना मी बळजबरीने आणीन. कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पीठीकापुरमला येऊ शकणार नाही. हे निश्चित. माझ्या निजतत्त्वास समजून, जाणून आनंदी व्हा. हा क्षण पुन्हा येणार नाही. सर्व देवता शक्ति माझ्याच स्वरूपात आहेत. कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतगुणाने, शतपटीने त्यांना त्यांच वेळेला परत देतो. धर्माविरुध्द न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो. व मोक्षाची प्राप्ति होते.'' श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले.
दुसरे दिवशी नृसिंह वर्मा आपल्या घोडा गाडीतून श्रीपादांना आपले शेत, जमीन दाखविण्यास घेऊन गेले. वर्मांना फार मोठी जमीन होती. त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती. त्यातील दोडक्याच्या वेलाला फूल येत नसे. कधीकाळी आले तरी सुकून जाई, गळून जाई. त्याजागी फळ येत नसे. एखाद्या वेलास फळ लागलेच ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे. नरसिंह वर्मानी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मलासुध्दा आवडते. पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती. या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन. या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमीतत्वात परिवर्तन घडेल. चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल. आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी, येथे पिकलेले दोडके पाठवा . घरच्यांच्या बरोबर मी सुध्दा ते जेवणात घेईन.
त्या दिवसा पासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले. ती दोडकी सुध्दा उत्तम प्रकारची व रुचकर होती. श्रीपाद प्रभू घोडा गाडीतून उतरुन कांही वेळ त्या भूमीवर फिरले. तेवढयात तेथे कांही चंचु (तेथील आदिवाशी) युवक युवती आल्या. त्या सर्वानी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रध्दाभावाने प्रणाम केला. श्रीपादांच्या दिव्य मुखकमला भोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसले. श्रीपाद तेंव्हा म्हणाले, ''आजोबा ! हे सर्व चंचुलोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात. तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात. तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल. श्रीपाद गंमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंह वर्माना वाटले. ते म्हणाले ''अरे चंचु युवकानो, तुम्ही नरसिंह देवाना पाहिलेत का ? त्यांचा ठावठिकाणा सांगु शकाल काय ? त्यावर एक चंचु युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड काम ? सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एव युवक या जंगलात फिरत असतो. त्याचे आमची बहिण चंचुलक्ष्मीवर प्रेम आहे. आमच्या छोटीला सुध्दा तो आवडतो. त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास चंचुलक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो. येवढे बोलून चंचु युवक, युवती निघून गेले. नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पहात होते. तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरुन एक युवक युवति येताना दिसले. श्रीपादानी सुब्बय्या श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले ''ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटतं ? ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत. थोडया काटक्यांचा ढीग करा आपण ते पेटवून गंमत पाहू या.'' नरसिंह वर्माना तर घाम फुटला. ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते. ते दोघे गुरुवायुर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना कुरूरअम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले. तिने त्यांना सहजच ''श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु'' असा आशिर्वाद दिला. तिच्या आशिर्वादाने त्यांच्यात भक्ति आणि वैराग्याचे बीज पडले. मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पीठीकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत आहेत. शंभर वर्षाची वृद्धा महायोगिनी होती म्हणून तिच्या आशिर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्याना इथेच झाले. काटक्या जळत असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला. थोडया वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळया आकृती बाहेर येऊन अग्नित रूदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या. यानंतर ते दोघे शुध्दिवर आले. तितक्यात चंचुलोक चंचुलक्ष्मीला घेऊन आले. नरसिंह देवाचे हात मागे बांधून चंचुलोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते. अशा चित्र विचित्र घटना पुर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादाच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कार पूर्ण व अनाकलनीय आहेत. श्रीपादानी नरसिंह देवाला प्रश्न केला ''पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का ? ही चंचुलक्ष्मी तुझी पत्नीच ना ? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना ? त्यावर नरसिंह देव त्रिवार हो म्हणाले. त्याच वेळी चंचुलक्ष्मी आणि नरसिंह देवानी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. चंचुमंडळी अंतर्धान पावले. बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षि झाला. चिंतामणी महायोगीनी झाली. चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्माच्या जमिनी असलेल्या गावास ''चित्रवाडा'' असे नांव पडले.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
0 Comments